हवामान अंदाज : या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा
राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासाठी अनुकूल हवामान आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने आजपासून पाच दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा सोमवारपासून तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यात रविवार ते बुधवार काही भागात अधूनमधून पावसाची शक्यता आहे.
आजपासून ते बुधवार पर्यंत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याने दोन्ही दिवशी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आणि बुधवारी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.