IMD weather forecast : कसा राहिल यंदाचा पावसाळा आयएमडी चा पहिला अंदाज जाहीर
भारतीय हवामान विभागाने (IMD) यावर्षी मान्सूनवर एल निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मान्सूनच्या पावसावर एल निनोचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे मान्सूनचे प्रमाण कमी होते.
पॅसिफिक महासागराच्या तापमानात वाढ झाल्यामुळे एल निनो तयार होतो. मान्सूनदरम्यान भारतात पावसावर एल निनोचा परिणाम होतो.
मान्सूनमध्ये सरासरीच्या तुलनेत एल निनोमुळे भारतात पावसाचे प्रमाण कमी होते. दरम्यान, सोमवारी भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना आयएमडीचे संचालक एम. महापात्रा म्हणाले की, हवामान अंदाज तसेच आंतरराष्ट्रीय अंदाजांच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की एल निनोचा या वर्षी मान्सूनवर परिणाम होणार नाही. या वर्षी आपल्याला तटस्थ परिस्थिती दिसू शकते. त्यामुळे, देशात या वर्षी सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान 2023 मध्ये, एल निनोचा मान्सूनवर मोठा परिणाम झाला. एल निनोमुळे मान्सूनचे प्रमाण सरासरी 8 टक्क्यांनी कमी झाले होते. गेल्या वर्षी, ना निनाच्या प्रभावामुळे 8 टक्के अतिरिक्त मान्सून पाऊस पडला होता. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 2023 मध्ये एल निनोमुळे कोरडा दुष्काळ पडला होता, तर 2024 मध्ये ना निनामुळे ओला दुष्काळ पडला होता. तथापि, यावर्षी सरासरी पाऊस असाच राहण्याची अपेक्षा आहे.
देशभरात उष्णतेची लाट असेल…
आणखी पुढे बोलताना महापात्रा म्हणाले की, यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, त्यापूर्वी एप्रिल ते जून या काळात देशात उष्णतेची लाट येऊ शकते. तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. देशाच्या काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वरही जाऊ शकते. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा 5 अंश सेल्सिअस जास्त आहे. ते म्हणाले की, पूर्व उत्तर भारतात तीव्र उष्णता दिसून येऊ शकते आणि पुढील दोन महिने महाराष्ट्रातही तीव्र उष्णता जाणवेल. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.